Tuesday, November 11, 2014

किस ऑफ लव्हचा तमाशा कशासाठी?


गेल्या काही वर्षात आधुनिकतेची परिभाषाच बदलली आहे. वेल्थ, वाईन, वुमेनच्या सभोवताल रेंगाळणारी ही व्याख्या उंबरठा ओलांडून जेव्हा स्वत:चे घर ध्वस्त करते, तेव्हा मग प्रत्येकाला त्यातले धोके कळू लागतात. कथित आधुनिक विचारांच्या आणि श्रीमंतीच्या झगमगाटाआड चालणार्‍या आक्षेपार्ह बाबी इथे घडतच नाहीत, असे नाही. पण त्या निदान चार भिंतींच्या आड तरी घडतात. त्या खुलेपणाने करण्याचे धाडस अजून इथे कुणाला झालेले नाही. आणि राहिला प्रश्‍न विचारांच्या आधुनिकतेचा, तर त्याचीही व्याख्या एकदा नव्याने ठरली पाहिजे. कपडे तोकडे घातल्याने आणि प्रेमालापाचे जाहीर प्रदर्शन मांडल्यानेच जर विचार ‘आधुनिक’ ठरणार असतील, तर मग नखशिखांत कपडे घालून वावरणार्‍या भूतान अन् म्यानमारमधील लोकांना काय बुरसटलेल्या विचारांचे ठरवायचे की सातव्या, आठव्या वर्गात शिकत असतानाच गर्भवती राहू लागलेल्या अमेरिकन विद्यार्थिनींना कर्तबगारीची प्रमाणपत्रे बहाल करायची? 
आपल्या देशात आंदोलनाचे फॅड काही कथित समाजसुधारकांच्या डोक्यात कायम घर करून बसलेले असते. ते कधी दिल्लीतील निर्भयाच्या प्रकरणात मेणबत्त्या पेटवायला सरसावतात, तर कधी अण्णा हजारेंच्या आंदोलनात गर्दी करून असतात. नंतरच्या काळात ओसरलेल्या गर्दीत ते कुठे हरवतात कुणालाच कळत नाही. सध्या या आंदोलकांनी ‘किस ऑफ लव्ह’ नावाचे आंदोलन या देशातल्या दिल्ली, कोलकाता, जम्मू सारख्या शहरांमध्ये उभारले आहे. या आंदोलनात उतरलेली तरुणाई भर रस्त्यांवर, पोलिसांसमोर, लोकांदेखत एकमेकांचे मुके घेत आहेत...घ्या आता काय करून घ्यायचे असेल ते, असे त्यांचे स्पष्ट आव्हान आहे. पोलिस, प्रशासन आणि त्यांच्या दृष्टीने ‘कथित’ ठरलेल्या संस्कृती रक्षकांनाही...
केरळातील कोझीकोडे नामक शहरातील एका हॉटेलपासून हा किस्सा काही दिवसांपूर्वी सुरू झाला. ते हॉटेल म्हणजे अधिकृत, अनधिकृत जोडप्यांसाठी ख्यात असलेले या शहरातले एक ठिकाण. मुला-मुलींनी किंवा इतरही जोडप्यांनी इथे एकत्र यायचं. चहा, स्नॅक्सच्या निमित्ताने तासन्‌तास बसायचं. आधुनिकतेच्या नावाखाली तरुणसुलभ बाबी इथे अधिक ‘खुल्या’दिलाने विचार आणि कृतीतून व्यक्त करायच्या, हा इथला शिरस्ता. हा प्रकार माहीत झाल्यावर, तो मान्य नसणार्‍यांनी एक दिवस या हॉटेलवर धाड घातली. अशा सार्वजनिक ठिकाणी त्यावेळी रासक्रीडेत मग्न असलेल्या काहींना चोप दिला. काहींची बखुटं धरून बाहेर काढलं गेलं. पुन्हा असलं काही कराल, तर याद राखा अशी तंबी देऊन काहींना सोडलं गेलं...
झालं, इथून पुढे वातावरण पेटत गेले. आधुनिक विचारांची कास धरलेली सारी तरुणाई रस्त्यावर उतरली. सार्वजनिक ठिकाणी जाहीररीत्या एकमेकांचे मुके घेण्याचे, त्यांच्या दृीष्टने ‘अनोखे’ असे आंदोलन सुरू झाले. सुरुवातीला केरळपर्यंत मर्यादित राहिलेले हे आंदोलन नंतरच्या काळात दूरवरच्या कोलकात्यात, मग राजधानी दिल्लीत आणि परवा जम्मूतही पोहोचले. प्रत्येक ठिकाणी त्या शहरातील तरुण-तरुणींनी सार्वजनिक ठिकाणी एकमेकांचे मुके घेत हे आंदोलन ‘यशस्वी’ केले. देशाच्या सीमेवर युद्ध लढायला निघाल्याच्या आवेशात या आंदोलनकर्त्यांनी भर रस्त्यांवर एकमेकांचे मुके घेत आपल्या प्रेमाचे सार्वजनिक प्रदर्शन मांडले. आणि तसे करून आपण फार मोठा पराक्रम गाजविला असल्याच्या आविर्भावात स्वत:ला अटक वगैरे करवून घेतली. या समाजात असलं काहीतरी विलक्षण केलं की त्याला पाठिंबा देत स्वत:च स्वत:ला पुरोगामित्वाचे प्रमाणपत्र बहाल करीत आपली पाठ थोपटून घेणार्‍यांची इथे तशीही वानवा नाही. याही आंदोलनाच्या निमित्तानं त्याचा प्रत्यय येतोय्.
काळाचा महिमा म्हणावा की काय पण, इथे एका पिढीला आपल्या नंतरच्या पिढीचे वागणे कधी रुचलेच नाही. आपल्या काळात आपण जे काही केले, करीत राहिलो, तेच योग्य आणि सर्वश्रेष्ठ असल्याचे स्वत:च ठरवून टाकत प्रत्येक पिढीतले लोक वावरतात. नंतरच्या पिढीतील प्रतिनिधींशी वागतात. दोन पिढ्यांमधील वैचारिक दरी हा इथे नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. पण, या प्रकरणात ही दरी दोन पिढ्यांमधली नाहीच. इथे तर एकमेकांचे मुके घेणारेही तरुण आणि त्यांना तसे करण्यापासून रोखणारेही तरुणच आहेच. त्यामुळे विचारांच्या मतभेदातून उद्भवलेला संघर्षही दोन पिढ्यांमधला नाहीच. तो भेद आहे विचारांच्या दिशांचा. तरुण सुलभ भावना व्यक्त करण्यावर आक्षेप नाहीच. फरक फक्त एवढाच आहे, की त्यातील एका गटाला त्या भावनांचे जाहीरपणे मांडले गेलेले प्रदर्शन मान्य आहे. केवळ मान्यच नाही, तर आधुनिकतेच्या नावाखाली त्याचे उदात्तीकरण करायला तो सरसावला आहे. आणि दुसर्‍या गटाला नेमके हेच नको आहे. दोन व्यक्तींच्या मनात एकमेकांबाबत प्रेमाची भावना निर्माण झाली असेल, तर त्यावर तिसर्‍या कुणाचा आक्षेप असण्याचे तसे काहीच कारण नाही. फक्त त्यानंतरचा प्रकार कुठल्याशा रेस्टॉरंटमध्ये, एखाद्या बगिच्यात, समुद्रकिनारी, भर रस्त्यांवर, सभोवतालच्या कुणाचीही तमा न बाळगता, आजुबाजूला कुणी वयाने मोठी व्यक्ती उपस्थित आहे याची काडीचीही पर्वा न करता, घडावा यावर त्यांचा आक्षेप आहे. तर स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारी मंडळी लागलीच त्या आक्षेप नोंदविणार्‍यांना पुराणमतवादी, प्रतिगामी वगैरे ठरवायला निघाली. आंदोलनाचे निमित्त करून रस्त्यावर उतरून जाहीर उच्छाद मांडू लागली.
या कथित पुरोगामी मंडळींचा आक्षेप या प्रकाराला विरोध करणार्‍या मंडळीला आहे, विरोध करण्याच्या त्यांच्या पद्धतीला आहे, की काही हिंदू संघटनांनी यात पुढाकार घेतला म्हणून हा सारा जळफळाट आहे? तोच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयांना टारगेट करून व्यक्त केला जातोय्? तिकडे अमेरिकेत आधुनिकतेच्या नावाखाली अनिर्बंध वागू लागलेल्या पोरांना शाळांसमोर कॅम्प उभारून कंडोम्स आणि मुलींना गर्भनिरोधक गोळ्या देण्याची वेळ आलेले पालक चिंताग्रस्त झाले असताना, इकडे स्वत:च्या संस्कृतीची सार्‍या जगात आगळी ओळख असलेल्या भारतात इंटरनेटच्या माध्यमातून तरुणाईसमोर उपलब्ध झालेल्या बाबी पालकांच्या आकलन आणि नियंत्रणाबाहेर चालल्या आहेत. त्यातून एक मोठीच सामाजिक समस्या उभी राहात आहे. समाजात वाढलेले बलात्काराचे प्रमाण हा कशाचा परिणाम आहे? आपले प्रेम मान्य न करणार्‍या तरुणीच्या चेहर्‍यावर ऍसिड फेकून तिचा चेहरा विद्रूप करण्याची विकृत मानसिकता कशातून उद्भवली आहे? या आंदोलाच्या निमित्ताने मैदानात उतरून सार्वजनिक ठिकाणच्या चाळ्यांचे खुले समर्थन करणार्‍यांपैकी किती जणांच्या आई-वडिलांना आपल्या पोरांनी असे काही केलेले मान्य होईल? इतकेच कशाला, यातील किती मुलांना त्यांच्या बहिणीने एखाद्या मुलासोबत असले चाळे भर चौकात केलेले खपतील? मुद्दा स्वत:च्या घरापाशी येऊन थांबला की नकारघंटा वाजवायची, तिथे ‘सातच्या आत घरात’चा नियम लावायचा आणि स्वत: मात्र दुसर्‍याच्या बहिणीशी निर्लज्ज प्रकार करायचा? परंपरा आणि संस्कृतीला लाथ मारून ती झिडकारण्याचा आव आणत बंडाचा झेंडा फडकावण्याची मर्दुमकी दाखवायची! दक्षिण भारतातल्या एक महिला संत लोकांची गळाभेट घेतात, मुके घेऊन लोकांना आशीर्वाद देतात, मग हिंदूंना काय अधिकार, या प्रकारावर आक्षेप नोंदविण्याचा, इतरांना तसे करण्यापासून रोखण्याचा, असा अनाठायी सवाल केरळातील एका सुशिक्षित व्यक्तीने उपस्थित करत स्वत:ची अक्कल पाजळली आहे. यांना खरंच त्या संताच्या वर्तनातील आणि कोझिकोडेच्या हॉटेलमध्ये चाललेल्या चाळ्यांमधील अंतर कळत नाही? गेल्या काही वर्षात आधुनिकतेची परिभाषाच बदलली आहे. वेल्थ, वाईन, वुमेनच्या सभोवताल रेंगाळणारी ही व्याख्या उंबरठा ओलांडून जेव्हा स्वत:चे घर ध्वस्त करते, तेव्हा मग प्रत्येकाला त्यातले धोके कळू लागतात. कथित आधुनिक विचारांच्या आणि श्रीमंतीच्या झगमगाटाआड चालणार्‍या आक्षेपार्ह बाबी इथे घडतच नाहीत, असे नाही. पण त्या निदान चार भिंतींच्या आड तरी घडतात. त्या खुलेपणाने करण्याचे धाडस अजून इथे कुणाला झालेले नाही. आणि राहिला प्रश्‍न विचारांच्या आधुनिकतेचा, तर त्याचीही व्याख्या एकदा नव्याने ठरली पाहिजे. कपडे तोकडे घातल्याने आणि प्रेमालापाचे जाहीर प्रदर्शन मांडल्यानेच जर विचार ‘आधुनिक’ ठरणार असतील, तर मग नखशिखांत कपडे घालून वावरणार्‍या भूतान अन् म्यानमारमधील लोकांना काय बुरसटलेल्या विचारांचे ठरवायचे की सातव्या, आठव्या वर्गात शिकत असतानाच गर्भवती राहू लागलेल्या अमेरिकन विद्यार्थिनींना कर्तबगारीची प्रमाणपत्रे बहाल करायची? मुळात, दोन व्यक्तींनी एकमेकांच्या सहमतीने, आपसात करावयाच्या गोष्टी सार्वजनिक रीत्या करू देण्याचा दुराग्रह कशासाठी चालला आहे? सामाजिक परिणाम विसरून त्याचे समर्थन तरी कशासाठी चालले आहे?

No comments:

Post a Comment